जनस्थान पुरस्कार -
ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकांसाठी दर वर्षाआड 'जनस्थान' पुरस्कार सुप्रसिध्द पाहुण्यांच्या देण्यात येतात. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे रूपये एक लाख व ब्राँझची सूर्यमूर्ती व सन्मानपत्र देऊन साहित्यिकांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. आतापर्यंत पुढील मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांपैकी काही नावे - विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२००१), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबुराव बागुल (२००७), ना. धो. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे (२०१३), अरुण साधू (२०१५), विजया राजाध्यक्ष (२०१७), वसंत आबाजी डहाके (२०१९), मधू मंगेश कर्णिक (२०२१)
गोदावरी गौरव
साहित्येत्तर क्षेत्रांसाठी आपआपल्या क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवर संस्मरणीय कामगिरी करणार्या व देशाची सांस्कृतिक उंची उचलणार्या ज्येष्ठांना केलेला ''हा कृतज्ञतेचा नमस्कार आहे, पुरस्कार नाही'' असे कुसुमाग्रजांनी जाणीवपूर्वक नोंदवून हा गौरव दरवर्षाआड देण्याचे निश्चित केले आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च रोजी ज्ञान-विज्ञान, चित्रपट-नाटय, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प, संगीत-नृत्य, व लोकसेवा ह्या क्षेत्रातील व्यक्तींना रुपये २१०००/- व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते.
आदिवासी विभाग
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात वैद्यकिय मदत देऊन रोगप्रतिबंधक औषधे आदिवासी पाडयांवर देणे. तेथील आदिवासींची नियमित तपासणी व उपचार करणे, गंभीर आजारांसाठी सहाय्य करणे. तेथील विकासात्मक कामांना चालना देणे. तेथे क्रीडास्पर्धा आदिवासी युवा-युवतींची शिबींरे घेऊन नैसर्गिक औषंधाबाबत संशोधन संगोपन करणे. नाशिकजवळ ४ गावांमध्ये असे काम चालू आहे.
साहित्य विभाग
मराठी भाषा, साहित्य ह्याबद्दल आस्था, आवड, निर्माण होण्यासाठी अभिरूची संवर्धनासाठी ''साहित्यभूषण'' ह्या परीक्षेचे आणि ''वि.वा.शिरवाडकर निंबध स्पर्धेचे'' आयोजन प्रतिवर्षी केले जाते. साहित्यभूषण ही परीक्षा १९९६ पासून सुरू असून महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील कुठलीही व्यक्ती ह्या परीक्षेस बसू शकते. अभ्यासकाला पूर्व शिक्षणाची व वयाची अट नाही मराठी व्यक्तीचे लक्ष वाचनाकडे केंद्रित व्हावे ह्यासाठी ही परीक्षा आहे. मराठी वाड्.मय प्रकारांतील विषयांवर अभ्यास पत्रिका, उत्तरपत्रिकांसह अभ्यासार्थिंना घरीच सोडवून प्रतिष्ठानकडे त्या पाठवायच्या असतात. ह्या परीक्षेस उर्तीण होणार्यांमध्ये प्रथम क्रमांक 'इंद्रायणी पुरस्कार', द्वितीय क्रमांक पुरस्कार गोदामाता व तृतीय 'कृष्णामाई' पुरस्कार असे तीन पुरस्कार दिले जातात.
संदर्भ ग्रंथालय व वाचनालय
अ) के. ज. म्हात्रे संदर्भ ग्रंथालय व वाचनालय
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या 'टिळकवाडी' येथील इमारतीत ग्रंथालय असून शासनाचा 'अ' दर्जा त्याला मिळाला असून तिथे २३००० च्या वर ग्रंथ तसेच संदर्भ ग्रंथालय असून तेथे १५०० च्या वर वर्गणीदार आहेत. शासनाचा उत्कृष्ट वाचनालयाचा ''डॉ. आंबेडकर पुरस्कार'' प्राप्त झाला आहे. असेच आणखी एक वाचनालय कुसुमाग्रज स्मारक ह्या वास्तूत असून तेथेही १२००० पुस्तके आहेत.
ब) ग्रंथ तुमच्या दारी -
नाशिक महानगराचा विस्तार वाढल्याने वाचक दूर रहायला गेल्यावर वाचनालयात नियमित येणे शक्य होत नाही. अशावेळी ग्रंथच वाचकांच्या दारी विनामूल्य देण्याचा अभिनव उपक्रम प्रतिष्ठानने सुरू केला असून त्यात उदंड प्रतिसाद लाभला आहे. ग्रंथप्रेमींनी प्रायोजित केलेल्या १०० पुस्तकांची पेटी शहरातील विविध ठिकाणच्या संकुलामध्ये/संस्थांमध्ये विनामूल्य उपलब्ध केली जाते. ही पुस्तके वाचून झाल्यावर नवीन ग्रंथपेटी उपलब्ध करून दिली जाते. नाशिकमध्ये अशा ९५ पेटया वितरीत झाल्या असून, हजारो वाचक त्याचा लाभ घेत आहे. या योजनेद्वारे नाशिक येथील मध्यवर्ती करागृहातील बंदिवानसुध्दा वाचनसंस्कृतीशी जोडले गेले आहे आहेत. नाशिक येथील औद्योगिक क्षेत्रात विविध कंपन्यांमध्ये ग्रंथ तुमच्या दारी ही योजना कार्यान्वित झाली आहे. भारतातील प्रमुख शहरे व भारताबाहेर दुबई, तोक्यो, नेदरर्लंड, अटलांटा, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशातही एकूण ६३५ ग्रंथपेट्या १ कोटी ५० लाख रुपयाच्या ग्रंथसंपदेद्वारे योजना यशस्वीपणे सुरु आहेत.
संगीत विभाग
भारतीय संगीताचा प्रसार व अभिरूची वाढविण्यासाठी स्मारकातील दालनामध्य शास्त्रीय व
उपशास्त्रीय गायन तसेच तबला वादन, शिक्षणाचे वर्ग भरवले जातात. याशिवाय विख्यात व ज्ञानी संगीततज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळाही भरवल्या जातात. (श्रीमती देवकी पंडीत व कलापिनी कोमकली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा मागील काही वर्षात आयोजित केल्या गेल्या व त्यांना संगितार्थी कडून उदंड प्रतिसाद मिळाला.) दरवर्षी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांना संपूर्ण राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतो.
नाट्य विभाग -
नाटक व अभिवाचन यांना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजीत केले जातात. तसेच नाट्य शिक्षण व अभिनय शिक्षणाच्या कार्यशाळा घेतल्या जातात.