कुसुमाग्रज एक समाज सेवक
कुसुमाग्रजांना गरजू व गरीब लोकांबद्दल खूप कळवळा होता. आदिवासी लोकांबद्दल जी माया होती ती त्यांच्या कार्यातून दिसून येते. यातूनच कुसुमाग्रज प्रतिष्ठानची योजना साकारली. ज्यासाठी त्यांनी १ लाख रू. दिले. अनेक स्वंयसेवक उभे करून त्यांनी अनेक योजना उभ्या केल्या. त्यात प्रौढ शिक्षण, आरोग्यसुविधा, सांस्कृतिक व क्रिडा शिबीरे यांचा समावेश असे. प्रतिष्ठानचे नाशिकच्या आसपासची ७ खेडी घेऊन हे उपक्रम राबवले. या सर्वठिकाणी कुसुमाग्रज वाचनालय उभे करण्यास सहाय्य दिले.
कुसुमाग्रजांनी सुरू केलेले पुरस्कार
कुसुमाग्रजांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना आंनद तर झाला पण त्यातूनच अशा अनेक साहित्यिकांना गौरवावे ही कल्पना साकारण्यासाठी 'जनस्थान' पुरस्काराचा जन्म झाला. त्याचा दृष्टीकोन फक्त साहित्यापुरताच सिमीत नव्हता तर इतर क्षेत्रातील मान्यवरांबद्दलही आदर होता. हे १९९२ साली त्यांनी सुरू केलेल्या 'गोदावरी पुरस्कारा' वरून दिसून येते. जो क्रिडा, कलानाटय, संगीत, चित्रपट, विज्ञान, चित्रकला, शिल्पकला व साहस अशा विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार असून भारतातील कुठल्याही भागातील योग्य व्यक्तीला तो देण्यात येतो.
अतिशय साधी रहाणी, मानवतेबद्दल कळवळा आणि समाजसेवेची तळमळ यामुळे नाशिकवासीयांना ते ऋषीतुल्य वाटत. अत्यंत नम्र व साध्या वागणुकीमुळे ते सर्वांना आपलेसे वाटतच पण त्यांच्याशी बोलतांना, वागतांना मोकळेपणा वाटे.
कुसुमाग्रज म्हणजे नाशिक व नाशिक म्हणजे कुसुमाग्रज असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
|